Saturday, July 27, 2019

पायल तडवी प्रकरणात आरोपींना कायद्यात अभिप्रेत निर्दोषत्व धारणा नाकारल्या गेली का?




पायल तडवी प्रकरणात फौजदारी खटल्यातील संकेतांची पायमल्ली झाली

‘अधिसभेने निवाड्याविषयी विचार करावा’, राजा त्यादिवशी विसाव्या वेळी म्हणाला.
‘नाही, नाही!’ राणी म्हणाली. ‘शिक्षा आधी – निवाडा नंतर.’
‘काहीतरीच आपले!’ अॅलिस उद्गारली. ‘शिक्षा कुठे निवाड्याआधी असते का?’
‘जीभ आवर तुझी!’ तिरीमिरीत राणी म्हणाली.
‘मी बोलणार!’ अॅलिस म्हणाली.
‘शिरच्छेद करा तिचा!’ राणी मोठ्याने ओरडली. सभा स्तब्ध झाली.

Alice’s Adventures in Wonderland

अवजड शासनयंत्रणा पायल तडवीच्या मृत्युनंतर तत्परतेने हलली. वेगवेगळ्या संस्थांना अचानक जाग आली. सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पायलचा लढा अंगिकारला. घोषणा झाल्या, फलकबाजी झाली. मेणबत्त्या लावून मोर्चे काढून झाले.

आरोपींविषयी कुणालाच आस्था नव्हती. त्यांनी त्यांच्या संघटनेला [MARD] उद्वेगाच्या भावनेने एक पत्र लिहिले, “जर जास्त कामाच्या ताणाला रॅगिंग म्हणून नाव दिले तर आम्ही आमच्या रोजच्या कामात सुद्धा कुणाला न कुणाला रॅगिंग करतच आलोय . . . .”

आरोपींचे हे पत्र त्यांची अगतिकता दाखवते, पण पायलला कामाचा ताण होता हेही सांगते. मयत पायलकडून त्या वेळपर्यंत काहीच नमूद नव्हते. पायलने आत्महत्येपूर्वी कुठली चिट्ठी लिहिली होती का याच्या चौकशीसाठी आरोपितांना कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर प्रकरणाची चौकशी मुंबई गुन्हे शाखेकडे करण्यात आली.
आरोपी डॉक्टरविरुध्दचा अतिशय गंभीर शिक्षा असलेल्या गुन्ह्यांची फिर्याद गडबडीने नोंदविण्यात आली.

[MARD] ला लिहिलेल्या पत्रात आरोपी आर्जव करतात, “पायलच्या आत्महत्येचे कारण आम्हाला माहिती नाही म्हणून विनाकारण आमहाला दोष देऊन अॅट्रॉसिटीचा आरोप आमच्यावर लावणे हा खूप मोठा अन्याय आहे.” वैद्यकीय जगत, पोलीस आणि एकंदरीत समाज या आत्महत्येचे कारण समजून घेण्यास असमर्थ आहेत.  

मात्र या पत्रानंतर परिस्थिती बदलली. आरोपींवर पायलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लागला. दरम्यान, Maharashtra University of Health Sciences [MUHS] ने एक तथ्यशोध समिती स्थापन केली. इंडियन मेडिकल असोसिएशन [इमा] ने सुध्दा एक समिती स्थापन केली. या समितीच्या अहवालाच्या आधारावर आरोपींचे संघटनेकडून निष्कासन करण्यात येऊ शकते. असे झाल्यास त्यांना पुढे पाच वर्षे कुठल्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार नाही. नायर हॉस्पिटलच्या रॅगिंगप्रतिबंधक समितीने आपला अहवाल सादर केला. याशिवाय राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोगाने याबाबतीत चौकशीसाठी नेमलेल्या समितीने हे प्रकरण हत्येचे आहे का असा प्रश्न उपस्थित केला.

आता ही बाब अलाहिदा कि या सर्व चौकश्या मुख्य पात्रांच्या अनुपस्थितीत झाल्या. कारण पायल तर बोलूच शकत नाही आणि आरोपी डॉक्टर कोठडीत. त्यांचे पालक काय बोलणार, त्यांना कितपत माहिती असणार? आणि मग नैसर्गिक न्यायाचा पहिला नियम कि सर्वांचे ऐकून निर्णय घ्यावा त्याचे काय? आणि या सर्व चौकशा इतक्या घाई गडबडीत कशासाठी? 

या सर्व समित्यांचे निष्कर्ष कदाचित तथ्यहीन होतील अशा वेगवेगळ्या पण एकमेकांशी निगडीत अशा तीन मोठ्या मुद्द्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष झाले. यांचा विचार योग्य रीतीने केल्यास आरोपींवरचे मळभ दूर होतील आणि वेगळेच चित्र समोर येईल अशी परिस्थिती आहे.

एक म्हणजे या घटनाक्रमात पायलचा विचार एक विवाहिता म्हणून झालाच नाही.तिच्या पतीशी तिचे संबंध कसे होते याविषयी कुणी काही बोलत नाही. पायलच्या भावाने सांगितले कि ती तिच्या माहेरच्या आर्थिक स्थैर्यासाठी शिक्षण घेत होती. तिचे आई वडील लवकरच निवृत्त होणार होते. प्रश्न असा, कि एक विवाहित स्त्री असा विचार का करेल? या टोकाच्या विरुध्द अशीही एक बातमी होती कि पायल तिच्या कामाला आणि त्यातून उद्भवणाऱ्या त्रासाला इतकी कंटाळली होती कि ती आपले शिक्षण सोडून द्यायच्या तयारीत होती. एकदा प्रवेश घेतलेला वैद्यकीय अभ्यासक्रम मधूनच सोडल्यास दंड लागतो. त्यासाठी भरावी लागणारी रक्कम म्हणून पायलने आपल्या माहेरच्या लोकांना रु. २० लाख तयार ठेवण्यास सांगितले होते. यातून असा प्रश्न कि इतकी रक्कम बाजूला बाळगून असलेल्या कुटुंबासाठी लग्न झालेल्या मुलीने कमावून द्यायची काय गरज आहे?

दुसरा मुद्दा असा कि पायल आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त होण्याइतकी अगतिक झाली होती हे गृहीत धरले तरी त्यासाठी इतर कारणे असण्याची शक्यता ठामपणे नाकारता येत नाही. विवाहसंबंधातील ताणतणाव, उज्ज्वल भविष्य दर्शविणारे शिक्षण पण ते पूर्ण करण्याची खरी अथवा आभासी असमर्थता, बेशिस्त वागण्यामुळे कामाचा कंटाळा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या. या व अशा कैक कारणांनी पायलच्या मनात आत्महत्येच्या वेळी विचारांचे काहूर माजवले असेल. एकच कारण असेल, नाही आहेच हे गृहीत धरून आरोपींना लक्ष्य करणे संयुक्तिक नाही.

तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोपींना या प्रकरणात तथाकथित गुन्हा करण्यामागे कुठलाही उघड दिसणारा असा हेतू नाही. परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित प्रकरणांमध्ये आरोपींचा हेतू सर्वतोपरी महत्वाचा असतो. सबळ हेतू दोषाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातो. हेतूचा अभाव आरोपितांना दोषमुक्त करू शकतो. दोष सिद्ध होईपर्यंत आरोपींना निर्दोष गृहीत धरले पाहिजे असा कायदा आहे.  

मात्र पायल तडवी प्रकरणात पोलिसांचा तपास आणि इतर समित्यांनी केलेली चौकशी यात काही बाबी गृहीत धरल्या गेल्या आहेत. पायलने लिहिलेल्या तथाकथित suicide note चे एक छायाचित्र  पोलीस तपासात पायलच्या फोनमध्ये सापडली अशी बातमी होती. पायलला जातीवर आधारित छळ होता आणि त्याला कंटाळूनच तिने आत्महत्त्या केली, तिला आत्महत्त्या करण्याचे दुसरे काही कारण नव्हते असे चित्र बातम्यात आणि लेखात होते. पण पायलने तिच्या आईला जातीचा उल्लेख करू नये असे सांगितले होते या बातमीशी हे चित्र विपर्यस्त आहे. पायलने 
स्वत: उल्लेख केला होता कि तिच्या सिनियर रेसिडेंटला तिची जात माहिती नाही.  

पायलच्या आत्महत्त्येनंतर आलेल्या वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांमधील बातम्यांमध्ये पायलच्या शेवटच्या दिवशीच्या हालचालींविषयी काहीच नाही. तिच्या फोनवरून शेवटचे कॉल कुणाला होते? whatsapp, sms संदेश कुणाला होते? हे बोलणे किंवा संदेश कशाविषयी होते?

पायलच्या मृत्युनंतर तिला या न त्या गोष्टीचे प्रतिक बनवण्याचे राजकारण झाले. हे राजकीय किंवा सामजिक संघटनांनी करणे स्वाभाविक आहे. पण आरोपींविरुध्द इतक्या पद्धतशीर योजनेने जनमत तयार करणे, त्यासाठी वेळोवेळी निवडक बातम्या प्रसारित होणे हे थोडे अनाकलनीय आहे. कुठेतरी काहीतरी चुकतंय.

प्रश्न असा कि पायलच्या मृत्यूमुळे आरोपींना काय फायदा झाला?  

महत्वाचा प्रश्न हा कि आरोपींकडे बोट दाखवून कुणाचा फायदा होतोय?

आणि पायल तडवीच्या मृत्युला समजून घेण्यासाठी कळीचा मुद्दा असा, कि  या प्रकरणात हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल आणि भक्ती मेहरे खलनायिका आहेत – का कुणाला वाचवण्यासाठी त्यांचा बळी दिला जातोय? 

                     अश्वम नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च
                     अज:पुत्रं बली दद्यात देवो दुर्बलघातक:
                      
         भावार्थ: घोडा नाही, हत्ती नाही, वाघ तर नाहीच नाही,  
                    शेळीच्या कोकराचाच बळी देतात
                   (कारण) देवसुद्धा दुर्बलांचा घात करतात 
                                                                                    © श्रीरंग चौधरी
© Shrirang Choudhary
Image courtesy: mumbaimirror.indiatimes.com
This article is adapted with edition from the original article in English
http://bit.ly/STC4evY
 

Tuesday, July 23, 2019

पायल तडवी आत्महत्येचे संदर्भ समजून घेताना


पायल तडवी मृत्यु: संदर्भ आणि आकलन
आणि म्हणून हे सर्व विद्वतजन
करत बसले भांडण
प्रत्येक जण आपल्या मतावर
खूपच खंबीर आणि ठाम
सर्व थोडे बरोबर असले तरी
वास्तवापासून खूपच लांब 

पायल तडवी २२ मे २०१९ रोजी मृत्युमुखी पडली. नायर हॉस्पिटल आणि टोपीवाला मेडिकल कॉलेज मध्ये ती जुनिअर रेसिडेंट स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत होती. सुरुवातीच्या वृत्तांकनात तिने तिच्या वरिष्ठांच्या जाचापायी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या आधारावर प्रवेश मिळविला असल्याने तिला त्रास दिला या आरोपावरून पायलच्या युनिटमधील तीन सिनिअर रेसिडेंटवर रॅगिंग, छळ करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांखाली गुन्हा दाखल झाला. कालांतराने त्यांना अटक झाली आणि त्या आता जेलमध्ये आहेत.  

प्रथमदर्शनी, पायल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणव्यवस्थेतला आणखी एक बळी असे दिसते. रेसिडेंट डॉक्टरना ज्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते त्यात सर्वच जण भरडले जातात. न संपणारा कार्यकाल, खूप कमी वेळात खूप अवघड विषय समजून घेऊन अभ्यास, रुग्णालयात काम करून कॉलेजच्या पिरीयडला हजेरी लावणे, वैद्यकीय कॉलेज मधली सेवाज्येष्ठतेची उतरंड ज्यात वयात खूप कमी अंतर असणारे डॉक्टर ज्येष्ठ कनिष्ट असतात. यावर कहर म्हणजे अशा जगण्यामुळे येणारा एकटेपणा आणि प्रचंड मानसिक ताण. 

पण पायलच्या मृत्युला अनेक पैलू होते. ती एक मुस्लिम आदिवासी महिला होती. बहुतेक निरक्षर अशा समाजातून आलेली ती पहिली डॉक्टर होती. तिच्या मृत्यूने वृत्तमाध्यमे साधकबाधक चर्चेने ढवळून निघाली. मृत्युच्या २४ तासाच्या आत ती समाज माध्यमांवर trending topic होती. पायल तडवी, एक अनामिका २४ तासात वेगवेगळ्या संघर्षाचे प्रतिक बनवून प्रस्तुत केल्या गेली. तिच्या मृत्यूची अतिशय खाजगी शोकांतिका ठळक मथळ्यांची एक मालिका बनली.   

लोक अनेक गोष्टी विनाकारण चर्चेत आणायला लागले. चटपटीत मथळ्यांच्या शोधात असलेले अतिउत्साही पत्रकार प्रकरणात काहीतरी नाट्यमय शोधायच्या नादात विषयाला भलतेच वळण लावून बसले. स्त्रीरोग तज्ञ म्हणून पदवी मिळविण्यात अंतर्भूत मानसिक आणि शारीरिक कष्ट, रेसिडेंट डॉक्टर म्हणून तणावाचे आयुष्य, यावर मात करून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारे मानसिक संतुलन यांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून पायल तडवीच्या आत्महत्येस एक खळबळजनक घटना याच दृष्टीकोनातून बघून या बातमीचे पुढील वृत्तांकन झाले.

इतर डॉक्टरचे अशा किंवा यापेक्षा वाईट परिस्थितीतून गेल्याचे दाखले दुर्लक्षित करण्यात आले. ज्युनिअर अंतरवासिता डॉक्टर आत्महत्येस प्रवण असतात या सर्वश्रुत बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. एक विवाहित स्त्री अतिशय कठीण अभ्यासक्रम पूर्ण करत असताना स्वत:शी आणि व्यवस्थेशी करत असलेला संघर्ष असा संदर्भ असताना तीन अभागी सिनिअर डॉक्टरशी (ज्या योगायोगाने खुल्या प्रवर्गातील आहेत) असलेला तिचा विसंवाद असे स्वरूप या प्रकरणाला मिळाले.  

यावर प्रतिक्रिया द्यायला उडी घेतलेले लोक वेगवेगळ्या वैचारिक धाटणीचे, वेगवेगळ्या राजकीय प्रवाहातून आलेले होते. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर ते प्रकाश आंबेडकरांचा मुलगा सुजात; नव्याने लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार कन्हैय्या कुमार ते अखिलेश यादवपर्यंत सर्वांनी या विषयावर सामाजिक दरी निर्माण होईल अशी भडक आणि बेताल वक्तव्ये केली.  

पायलची जात अर्थातच यातील सर्वात प्रभावी मुद्दा आहे. तरीपण पायलला तिच्या सिनिअरनी दिलेला त्रास किंवा तिचा केलेला अपमान वगैरेपुरता सीमित राहिला असता तर पायलच्या आत्महत्येचा विषय इतका दाहक झाला नसता. पण २६ मे रोजी पायलच्या आईने असे आरोप केले कि पायलला जमिनीवर झोपायला लावलं जायचं आणि तिच्या जातीमुळे तिच्याशी दुजाभाव केला जायचा. या आरोपांमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. आता हा विषय सिनिअर किंवा जुनिअर रेसिडेंट असा न राहता एका दलित महिलेचा तथाकथित उच्चवर्णीयांकडून झालेला छळ असा झाला.

पश्चातबुद्धीने केलेल्या आरोपांमुळे अॅट्रॉसिटी कायद्याचे कलम लागले आणि आत्महत्येच्या आणखी एका प्रकरणाइतके महत्व असलेल्या या विषयाचे रुपांतर आरक्षित वर्ग आणि अनारक्षित वर्ग यांमधील विसंवादात झाले. काही वृत्तमाध्यमांनी याचे वर्ण सवर्ण आणि दलित यातील संघर्ष असे केले.   

पण पायलने आत्महत्या का केली हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. पायलचा भाऊ, आई आणि तिचे पती यांच्या मुलाखती वृत्तपत्रात आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या, त्याचप्रमाणे प्रकरणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसलेल्या लोकांनी सवंग प्रसिद्धीसाठी केलेली विधानेही लोकांपर्यंत पोहोचली. स्वत: पायलने याबाबत कुठेही खुलासा करणारे विधान केले नाही याचा सर्वांनी सोयीस्करपणे विसर पाडून घेतलेला दिसतो.   

पायलच्या मृत्यूसंबंधीची चर्चा हत्ती आणि आंधळे व्यक्ती या रुपकाचे तंतोतंत उदाहरण झाले आहे. या घटनेच्या वृत्तांकनात ज्या ज्या चुका होऊ शकतात त्या झाल्या आहेत. या आत्महत्येचे दुर्दैवी राजकीय समीकरण बनवण्याचा प्रयत्न झाला. त्या नादात या घटनेचा विचार वेगवेगळ्या पध्दतीने केलं गेलाय. डॉक्टर लोकांच्या मते ही आत्महत्या रेसिडेंट म्हणून होती असलेल्या त्रासातून उद्भवलेल्या ताणामुळे झाली आहे. अनुभवी वैद्यकीय अधिकारी सांगतात कि स्त्री रोग तज्ञ म्हणून करावे लागणारे उपचार आणि तदानुषंगिक शस्त्रक्रिया खूप जिकीरीचे आणि जोखमीचे काम असते, त्यामुळे खूप थकवा येऊ शकतो. सर्व डॉक्टर एक्माताने सांगतात कि एकंदर परिस्थितीत भारतात जास्त डॉक्टर आणि चांगल्या पायाभूत सुविधांची चणचण असल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे.

काही डॉक्टरांनी समाज माध्यमांवर आपली मते मांडली आहेत. काहींच्या मते पायल नैराश्याने ग्रस्त होती आणि याचे निदान न झाल्यामुळे तिला इलाज नाही करता आला. इतरांच्या मते तिला तिच्या कामात अपेक्षित कर्तव्यपूर्तीसाठी लागणारी पात्रता नव्हती. तिला तणावाचे व्यवस्थापन नीट करता आले नाही. तिला आरक्षणामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला पण पदव्युत्तर शिक्षणासाठी तिच्याकडे पात्रता नव्हती वगैरे. हे खरे असू शकते कि पायलच्या मृत्युला अतिशय चूक अशी आरक्षणाची व्यवस्था कारणीभूत आहे, कि पायलच्या जागी एखादी विद्यार्थिनी गुणवत्तेच्या आधारावर जर लागली असती तर ती हा अभ्यासक्रम चांगल्या पध्दतीने पार पडू शकली असती.

तसेही आरक्षणाच्या बाबतीत पुनर्विचार होणे कित्येक बाजूंनी अनिवार्य झालेले आहे. आरक्षणाच्या वाईट परिणामांविषयी चर्चा चालूच आहे. शैक्षणिक दृष्ट्या अपात्र व्यक्ती खूप दुर्लभ अशा जागा मिळवतात आणि नंतर शैक्षणिक दुर्बलतेमुळे किंवा अभ्यास आणि पात्रतेच्या कमतरतेमुळे तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाहीत. परिणामी ती जागा वाया जाते. हे पूर्णत: शक्य आहे कि पायल शैक्षणिकदृष्ट्या किंवा बुध्दिमत्तेच्या निकषांवर स्त्री रोग तज्ञ म्हणून अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अपात्र होती, पण हेही तितकेच खरे कि पायल तडवीने तिच्या वैयक्तीक कारणांमुळे आत्महत्या केली असावी. असे कळते कि तिने नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता.  

पण हे सर्व मुद्द्यास सोडून आहे. मुद्दा असा कि एक आयुष्य संपले. आत्महत्येच्या कारणांची पूर्ण चौकशी होऊन कारणे शोधून त्यांचे निवारण करण्यासाठी उपाय शोधले गेले पाहिजेत. याद्वारे पुढे अशा दुर्दैवी घटनांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबविण्यास मदत मिळेल. जर आत्महत्या आरोपीच्या कारणामुळे झाली असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे.

पण कुणीही डॉक्टर हे ऐकून घ्यायला तयार नाही कि पायल जातीवर आधारित छळाची शिकार असेल. त्यांच्या मते वेगवेगळ्या संभावना आहेत. काहींच्या मते पायलचा घटस्फोट झाला असला तरी त्याबाबतीत काहीच चौकशी नाही हे संशयास्पद आहे. काहींच्या मते पायलने एमबीबीएसला आरक्षणाच्या आधारावर प्रवेश घेतल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमात लक्ष दिले नाही. काही स्पष्टवक्ते म्हणतात कि पायलला कामाचा कंटाळा होता आणि ती आपल्या कामाचे तास बुडवायची, त्यामुळे ती बेजबाबदार झाली आणि तिने कामाकडे दुर्लक्ष केले.    
डॉक्टर होणे, त्यातल्या त्यात विशेषज्ञ होणे अवघड काम आहे. ज्याचे मित्र किंवा नातेवाईक डॉक्टर आहेत फक्त अशा बाहेरच्यांना ते कसे शिकतात याविषयी कल्पना असते. आयुष्य त्या काळात खडतर असते. मरण त्यापेक्षा अवघड, विशेषकरून जेव्हा ते मरण एक राष्ट्रीय मुद्दा म्हणून पुढे येते, आणि मयताचा कुठलाही दोष नसताना त्याचे राजकारण केले जाते.

पायलच्या मृत्युनंतर घडणाऱ्या घटनांचे वृत्तांकन अचूक आणि निष्पक्ष होणे, हीच मरणाचेही कसे राजकारण केले जाते याचे प्रतिक बनलेल्या पायल तडवीला खरी आदरांजली राहील.

श्रीरंग चौधरी
©Shrirang Choudhary

हे लेखकाच्या Understanding the death of Payal Tadvi and corresponding issues या लेखाचे स्वैर भाषांतर आहे. 
मूळ लेख वाचण्यासाठी  इथे क्लिक करा


पदोन्नतीमधील आरक्षण: विषय, आशय आणि महत्त्व

 साला मै तो साहब बन गया  साहब बन के ऐसा तन गया  ये सूट मेरा देखो ये बूट मेरा देखो  जैसा छोरा कोई लंडन का !   महाराष्ट्रामध्ये शासकीय सेवा...