Tuesday, July 23, 2019

पायल तडवी आत्महत्येचे संदर्भ समजून घेताना


पायल तडवी मृत्यु: संदर्भ आणि आकलन
आणि म्हणून हे सर्व विद्वतजन
करत बसले भांडण
प्रत्येक जण आपल्या मतावर
खूपच खंबीर आणि ठाम
सर्व थोडे बरोबर असले तरी
वास्तवापासून खूपच लांब 

पायल तडवी २२ मे २०१९ रोजी मृत्युमुखी पडली. नायर हॉस्पिटल आणि टोपीवाला मेडिकल कॉलेज मध्ये ती जुनिअर रेसिडेंट स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत होती. सुरुवातीच्या वृत्तांकनात तिने तिच्या वरिष्ठांच्या जाचापायी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या आधारावर प्रवेश मिळविला असल्याने तिला त्रास दिला या आरोपावरून पायलच्या युनिटमधील तीन सिनिअर रेसिडेंटवर रॅगिंग, छळ करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांखाली गुन्हा दाखल झाला. कालांतराने त्यांना अटक झाली आणि त्या आता जेलमध्ये आहेत.  

प्रथमदर्शनी, पायल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणव्यवस्थेतला आणखी एक बळी असे दिसते. रेसिडेंट डॉक्टरना ज्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते त्यात सर्वच जण भरडले जातात. न संपणारा कार्यकाल, खूप कमी वेळात खूप अवघड विषय समजून घेऊन अभ्यास, रुग्णालयात काम करून कॉलेजच्या पिरीयडला हजेरी लावणे, वैद्यकीय कॉलेज मधली सेवाज्येष्ठतेची उतरंड ज्यात वयात खूप कमी अंतर असणारे डॉक्टर ज्येष्ठ कनिष्ट असतात. यावर कहर म्हणजे अशा जगण्यामुळे येणारा एकटेपणा आणि प्रचंड मानसिक ताण. 

पण पायलच्या मृत्युला अनेक पैलू होते. ती एक मुस्लिम आदिवासी महिला होती. बहुतेक निरक्षर अशा समाजातून आलेली ती पहिली डॉक्टर होती. तिच्या मृत्यूने वृत्तमाध्यमे साधकबाधक चर्चेने ढवळून निघाली. मृत्युच्या २४ तासाच्या आत ती समाज माध्यमांवर trending topic होती. पायल तडवी, एक अनामिका २४ तासात वेगवेगळ्या संघर्षाचे प्रतिक बनवून प्रस्तुत केल्या गेली. तिच्या मृत्यूची अतिशय खाजगी शोकांतिका ठळक मथळ्यांची एक मालिका बनली.   

लोक अनेक गोष्टी विनाकारण चर्चेत आणायला लागले. चटपटीत मथळ्यांच्या शोधात असलेले अतिउत्साही पत्रकार प्रकरणात काहीतरी नाट्यमय शोधायच्या नादात विषयाला भलतेच वळण लावून बसले. स्त्रीरोग तज्ञ म्हणून पदवी मिळविण्यात अंतर्भूत मानसिक आणि शारीरिक कष्ट, रेसिडेंट डॉक्टर म्हणून तणावाचे आयुष्य, यावर मात करून अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारे मानसिक संतुलन यांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करून पायल तडवीच्या आत्महत्येस एक खळबळजनक घटना याच दृष्टीकोनातून बघून या बातमीचे पुढील वृत्तांकन झाले.

इतर डॉक्टरचे अशा किंवा यापेक्षा वाईट परिस्थितीतून गेल्याचे दाखले दुर्लक्षित करण्यात आले. ज्युनिअर अंतरवासिता डॉक्टर आत्महत्येस प्रवण असतात या सर्वश्रुत बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. एक विवाहित स्त्री अतिशय कठीण अभ्यासक्रम पूर्ण करत असताना स्वत:शी आणि व्यवस्थेशी करत असलेला संघर्ष असा संदर्भ असताना तीन अभागी सिनिअर डॉक्टरशी (ज्या योगायोगाने खुल्या प्रवर्गातील आहेत) असलेला तिचा विसंवाद असे स्वरूप या प्रकरणाला मिळाले.  

यावर प्रतिक्रिया द्यायला उडी घेतलेले लोक वेगवेगळ्या वैचारिक धाटणीचे, वेगवेगळ्या राजकीय प्रवाहातून आलेले होते. भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर ते प्रकाश आंबेडकरांचा मुलगा सुजात; नव्याने लोकसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार कन्हैय्या कुमार ते अखिलेश यादवपर्यंत सर्वांनी या विषयावर सामाजिक दरी निर्माण होईल अशी भडक आणि बेताल वक्तव्ये केली.  

पायलची जात अर्थातच यातील सर्वात प्रभावी मुद्दा आहे. तरीपण पायलला तिच्या सिनिअरनी दिलेला त्रास किंवा तिचा केलेला अपमान वगैरेपुरता सीमित राहिला असता तर पायलच्या आत्महत्येचा विषय इतका दाहक झाला नसता. पण २६ मे रोजी पायलच्या आईने असे आरोप केले कि पायलला जमिनीवर झोपायला लावलं जायचं आणि तिच्या जातीमुळे तिच्याशी दुजाभाव केला जायचा. या आरोपांमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. आता हा विषय सिनिअर किंवा जुनिअर रेसिडेंट असा न राहता एका दलित महिलेचा तथाकथित उच्चवर्णीयांकडून झालेला छळ असा झाला.

पश्चातबुद्धीने केलेल्या आरोपांमुळे अॅट्रॉसिटी कायद्याचे कलम लागले आणि आत्महत्येच्या आणखी एका प्रकरणाइतके महत्व असलेल्या या विषयाचे रुपांतर आरक्षित वर्ग आणि अनारक्षित वर्ग यांमधील विसंवादात झाले. काही वृत्तमाध्यमांनी याचे वर्ण सवर्ण आणि दलित यातील संघर्ष असे केले.   

पण पायलने आत्महत्या का केली हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. पायलचा भाऊ, आई आणि तिचे पती यांच्या मुलाखती वृत्तपत्रात आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या, त्याचप्रमाणे प्रकरणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसलेल्या लोकांनी सवंग प्रसिद्धीसाठी केलेली विधानेही लोकांपर्यंत पोहोचली. स्वत: पायलने याबाबत कुठेही खुलासा करणारे विधान केले नाही याचा सर्वांनी सोयीस्करपणे विसर पाडून घेतलेला दिसतो.   

पायलच्या मृत्यूसंबंधीची चर्चा हत्ती आणि आंधळे व्यक्ती या रुपकाचे तंतोतंत उदाहरण झाले आहे. या घटनेच्या वृत्तांकनात ज्या ज्या चुका होऊ शकतात त्या झाल्या आहेत. या आत्महत्येचे दुर्दैवी राजकीय समीकरण बनवण्याचा प्रयत्न झाला. त्या नादात या घटनेचा विचार वेगवेगळ्या पध्दतीने केलं गेलाय. डॉक्टर लोकांच्या मते ही आत्महत्या रेसिडेंट म्हणून होती असलेल्या त्रासातून उद्भवलेल्या ताणामुळे झाली आहे. अनुभवी वैद्यकीय अधिकारी सांगतात कि स्त्री रोग तज्ञ म्हणून करावे लागणारे उपचार आणि तदानुषंगिक शस्त्रक्रिया खूप जिकीरीचे आणि जोखमीचे काम असते, त्यामुळे खूप थकवा येऊ शकतो. सर्व डॉक्टर एक्माताने सांगतात कि एकंदर परिस्थितीत भारतात जास्त डॉक्टर आणि चांगल्या पायाभूत सुविधांची चणचण असल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे.

काही डॉक्टरांनी समाज माध्यमांवर आपली मते मांडली आहेत. काहींच्या मते पायल नैराश्याने ग्रस्त होती आणि याचे निदान न झाल्यामुळे तिला इलाज नाही करता आला. इतरांच्या मते तिला तिच्या कामात अपेक्षित कर्तव्यपूर्तीसाठी लागणारी पात्रता नव्हती. तिला तणावाचे व्यवस्थापन नीट करता आले नाही. तिला आरक्षणामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला पण पदव्युत्तर शिक्षणासाठी तिच्याकडे पात्रता नव्हती वगैरे. हे खरे असू शकते कि पायलच्या मृत्युला अतिशय चूक अशी आरक्षणाची व्यवस्था कारणीभूत आहे, कि पायलच्या जागी एखादी विद्यार्थिनी गुणवत्तेच्या आधारावर जर लागली असती तर ती हा अभ्यासक्रम चांगल्या पध्दतीने पार पडू शकली असती.

तसेही आरक्षणाच्या बाबतीत पुनर्विचार होणे कित्येक बाजूंनी अनिवार्य झालेले आहे. आरक्षणाच्या वाईट परिणामांविषयी चर्चा चालूच आहे. शैक्षणिक दृष्ट्या अपात्र व्यक्ती खूप दुर्लभ अशा जागा मिळवतात आणि नंतर शैक्षणिक दुर्बलतेमुळे किंवा अभ्यास आणि पात्रतेच्या कमतरतेमुळे तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाहीत. परिणामी ती जागा वाया जाते. हे पूर्णत: शक्य आहे कि पायल शैक्षणिकदृष्ट्या किंवा बुध्दिमत्तेच्या निकषांवर स्त्री रोग तज्ञ म्हणून अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अपात्र होती, पण हेही तितकेच खरे कि पायल तडवीने तिच्या वैयक्तीक कारणांमुळे आत्महत्या केली असावी. असे कळते कि तिने नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता.  

पण हे सर्व मुद्द्यास सोडून आहे. मुद्दा असा कि एक आयुष्य संपले. आत्महत्येच्या कारणांची पूर्ण चौकशी होऊन कारणे शोधून त्यांचे निवारण करण्यासाठी उपाय शोधले गेले पाहिजेत. याद्वारे पुढे अशा दुर्दैवी घटनांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबविण्यास मदत मिळेल. जर आत्महत्या आरोपीच्या कारणामुळे झाली असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे.

पण कुणीही डॉक्टर हे ऐकून घ्यायला तयार नाही कि पायल जातीवर आधारित छळाची शिकार असेल. त्यांच्या मते वेगवेगळ्या संभावना आहेत. काहींच्या मते पायलचा घटस्फोट झाला असला तरी त्याबाबतीत काहीच चौकशी नाही हे संशयास्पद आहे. काहींच्या मते पायलने एमबीबीएसला आरक्षणाच्या आधारावर प्रवेश घेतल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमात लक्ष दिले नाही. काही स्पष्टवक्ते म्हणतात कि पायलला कामाचा कंटाळा होता आणि ती आपल्या कामाचे तास बुडवायची, त्यामुळे ती बेजबाबदार झाली आणि तिने कामाकडे दुर्लक्ष केले.    
डॉक्टर होणे, त्यातल्या त्यात विशेषज्ञ होणे अवघड काम आहे. ज्याचे मित्र किंवा नातेवाईक डॉक्टर आहेत फक्त अशा बाहेरच्यांना ते कसे शिकतात याविषयी कल्पना असते. आयुष्य त्या काळात खडतर असते. मरण त्यापेक्षा अवघड, विशेषकरून जेव्हा ते मरण एक राष्ट्रीय मुद्दा म्हणून पुढे येते, आणि मयताचा कुठलाही दोष नसताना त्याचे राजकारण केले जाते.

पायलच्या मृत्युनंतर घडणाऱ्या घटनांचे वृत्तांकन अचूक आणि निष्पक्ष होणे, हीच मरणाचेही कसे राजकारण केले जाते याचे प्रतिक बनलेल्या पायल तडवीला खरी आदरांजली राहील.

श्रीरंग चौधरी
©Shrirang Choudhary

हे लेखकाच्या Understanding the death of Payal Tadvi and corresponding issues या लेखाचे स्वैर भाषांतर आहे. 
मूळ लेख वाचण्यासाठी  इथे क्लिक करा


2 comments:

  1. अतिशय मुद्देसूद आणि सुरेख लिहिले आहे, मी अनेक groups वर forward करते आहे, सर्वानीच वाचून forward करावे, ह्या लेखाला आणि त्यातील विषयाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळायला हवी.

    ReplyDelete
  2. Payal tadvi is surely a victim of caste based reservation. If someone is not having the ability to sustain such a tough course why to waste the seat ? And to suicide is cowardness instead to face the reality....are we waiting for the suicide of the three brilliant doctors ?

    ReplyDelete

पदोन्नतीमधील आरक्षण: विषय, आशय आणि महत्त्व

 साला मै तो साहब बन गया  साहब बन के ऐसा तन गया  ये सूट मेरा देखो ये बूट मेरा देखो  जैसा छोरा कोई लंडन का !   महाराष्ट्रामध्ये शासकीय सेवा...